राजकारणात सामान्य माणसाला काय मिळतं? उमेदवाराला तिकीट, पत्रकाराला पाकीट आणि जनतेला कुणाच्या तरी विजयात आनंद! पण अशा या बदलत्या राजकारणात एक माणूस असा आहे जो आजारी असो, निराश असो किंवा त्याचा पराभव झालेला असो, तो नेहमीच लोकांसाठी खांदा आणि आधार बनून उभा असतो. ते व्यक्तिमत्व म्हणजे शरद पवार. गेल्या काही वर्षांत ते खुद्द निवडणुकीत उभे नसतात, पण अनेक लोक त्यांच्या भरोशावर उभे असतात.
विश्वसनीयता आणि आधार: इंडिया आघाडीच्या सभेत राहुल गांधी आणि शरद पवार एकमेकांचा हात धरून उभे होते. तेव्हा राहुल गांधी यांना पवारांचा हात हातात असल्याचा किती मोठा आधार वाटला असेल, हे समजून घेण्याची गरज आहे. शरद पवार हे कृष्णासारखे आहेत, त्यांना राजकारणी सोबतच एक ‘माणूस’ म्हणून समजून घेतलं पाहिजे. बारामतीच्या दुष्काळी भागात तरुणपणीच पाण्याचं नियोजन करणारा माणूस म्हणून ते माहीत पाहिजेत.
रिस्क घेण्याची तयारी आणि नेतृत्व: शरद पवार यांच्याकडून सर्वात महत्त्वाची गोष्ट शिकण्यासारखी आहे ती म्हणजे ‘रिस्क घेण्याची तयारी’. योग्य संधी दिसताच ते महाराष्ट्राचे सर्वात तरुण मुख्यमंत्री झाले. मराठवाडा विद्यापीठ नामांतरासारखा अवघड विषय त्यांनी उत्तमरीत्या हाताळला. त्यांनी अनेक नेते घडवले – सुशीलकुमार शिंदे, आर.आर. पाटील, जयंत पाटील, छगन भुजबळ, प्रफुल्ल पटेल. काही सोबत राहिले, काही सोडून गेले, पण त्यांनी कधीही संतापून निवृत्ती घेतली नाही. गोविंद बाग ही अशी चमत्कारी बाग आहे जिथली रोपं वेगवेगळ्या अंगणात जाऊन स्थिरावली.
अभ्यासू वृत्ती आणि जनसंपर्क: पवार हे उत्तम राजकारणी तर आहेतच, पण ते निसर्गप्रेमी आणि शेतीची जाण असलेले नेते आहेत. ते उत्तम वाचक आहेत, जगभरातल्या चांगल्या पुस्तकांची आणि नवीन तंत्रज्ञानाची त्यांना खबर असते. राईट विंग किंवा लेफ्ट विंग होण्यात धन्यता मानण्यापेक्षा दोन्ही गटांत उत्तम संपर्क कसा ठेवावा, हे त्यांच्याकडून शिकलं पाहिजे. खेळ, राजकारण, साहित्य, नाटक, शिक्षण, कृषी आणि संरक्षण अशा वेगवेगळ्या क्षेत्रांतलं त्यांचं ज्ञान अगाध आहे.
लढाऊ वृत्ती (Fighting Spirit): देशातल्या तरुणाला मैदानात लढण्यासाठी गीता वाचायची गरज नाही, फक्त शरद पवार माहीत असले तरी पुरेसं आहे. शेजाऱ्याने घर बळकावलं किंवा भावकीने बांध कोरला, तर रडत बसायचं नाही, पवारांना आठवून फाईट करण्याची जिद्द निर्माण करायची. पक्षाचे घड्याळ चोरीला गेलं म्हणून दुःख करत बसण्यापेक्षा हातात ‘तुतारी’ घेऊन असा माहोल करायचा की घड्याळ परत आणून द्यायची इच्छा होईल.
निंदा आणि संकटावर मात: गेली ३०-४० वर्षं विरोधकांनी त्यांच्यावर असंख्य आरोप केले, पण ते डगमगले नाहीत. आरोप करणाऱ्यांना घाम फोडण्याची कला त्यांच्याकडे आहे. कॅन्सरसारख्या गंभीर रोगालाही त्यांनी वर्षानुवर्षे हरवलं आहे. आज देशभरातील कॅन्सर पेशंट्ससाठी शरद पवार हे नाव एक प्रेरणा आहे. “पवार या वयात कॅन्सरला हरवू शकतात तर तू का नाही?”, हे वाक्य पेशंटला दिलासा देतं.
निष्कर्ष:
या निवडणुकीत पक्ष फुटले, चिन्हं चोरली गेली, पण या म्हाताऱ्या माणसाने महाराष्ट्राच्या स्वाभिमानाला झालेला मुडदूस एका झटक्यात बरा केला. गर्लफ्रेंडने दगा दिला तर पोरं रडत बसतात, पण हा माणूस चिन्हासहित पक्ष चोरून नेला तरी खचला नाही, लढला आणि जिंकला. आपण पण लढलं पाहिजे. निराश झाल्यावर थेट पवारांकडे जावं आणि म्हणावं, “पाठीवर हात ठेवून फक्त लढ म्हणा!”
